मिरपूर : आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची मंगळवारी श्रीलंकेशी लढत होत आहे. नुकताच मायदेशात झालेल्या टी-२० सिरीजमध्ये भारताने लंकेला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र त्याचबरोबर संघातील महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापती हा संघासाठी चिंतेचा विषय बनलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाठदुखीचा त्रास असतानाही कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन्ही सामन्यांत खेळला होता. पहिल्या सामन्यात बांगलादेशला ४५ सामन्यांनी हरवले होते तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट राखून विजय मिळवलाय. त्यामुळे उपांत्यफेरीतील स्थान निश्चित झाल्यासारखे आहे. 


दुखापतीने श्रीलंका संघालाही ग्रासले आहे. श्रीलंकेचा कर्णधार आणि गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे या स्पर्धेत तो पुढे खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. 


धोनीलाही पाठदुखीची चिंता सतावतेय. त्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मालाही दुखापत झालीये. चेंडू पायाच्या बोटाला लागल्याने रविवारी बोटाचा एक्सरे काढण्यात आला. त्यामुळे श्रीलंका सामन्याआधी दुखापतीतून तो सावरतो का हे पाहावं लागेल. 


गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास तेथे भारतीय संघाला चिंतेचे कारण नाही. गेल्या आठ सामन्यात खेळणाऱ्या आशिष नेहराला या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी कदाचित भुवनेश्वर कुमारला संधी मिळेल. युवा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह चांगला खेळ करतायत. स्पिनर्समध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाची कामगिरीही चांगली होतेय. हरभजन सिंगचा संघात समावेश नसला तरी अद्याप त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही.