मुंबई : गोल्फर आदिती अशोकनं आपल्या देदिप्यमान कामगिरी अवघ्या गोल्फ जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलंय. वयाच्या अठराव्या वर्षी तिनं गोल्फ विश्वात आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिती अशोक.... गोल्फच्या दुनियेत सध्या याच नावाचा बोलबाला आहे. गोल्फ कोर्सवर आदिती एकामागून एक टुर्नामेट जिंकत इतिहासाला गवसणी घालतेय. गोल्फ रँकिंगमध्येही तिनं गगनभरारी घेतली आहे. २०१६ चा गोल्फ सीझन हा खऱ्या अर्थानं तिच्यासाठी एक स्पेशल सीझन ठरला. मुळची बंगळुरुची असलेल्या आदितीनं वयाच्या पाचव्या वर्षापासून गोल्फचे धडे घ्यायला सुरुवात केली. अॅम्युच्युअर गोल्फ गाजवल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये ती प्रोफेशनल गोल्फकडे वळली आणि यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. ती जगातील सर्वोत्त्म गोल्फपटूंपैकी एक आहे.


आदिती अशोक सध्याच्या घडीला गोल्फ रँकिंगमध्ये १३२ व्या क्रमांकावर आहे. आपल्या असामान्य कामगिरीनं तिनं एका आठवड्यात ६६ गोल्फपटूंना मागे टाकत आपलं रँकिंग सुधारलं. 'हिरो इंडियन ओपन' जिंकत तिनं या सीझनची सुरुवात धडाक्यात केली. यानंतर युरोपियन टूर जिंकत इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय गोल्फर ठरली होती. आदितीनं 'कतार ओपन' जिंकत आणखी एका विक्रमाची नोंद केली. एशियन युथ गेम्स, युथ ऑलिम्पिक गेम्स, एशियन गेम्स आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी ती एकमेव महिला गोल्फर आहे. यावरुनचं आदितीचा धडाका लक्षात येईल.


रिओ ऑलिम्पिकमध्ये आदितीनं धाडेकबाज कामगिरी केली होती. मात्र, तिला मेडलनं हुलकावणी दिली होती. आदितीनं गोल्फच्या जगात आपलं नाण अगदी खणखणीत वाजवलंय. आता 'दुबई लेडीज मास्टर्स'मध्ये ती भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. यातही ती विजयासाठी प्रमुख दावेदार मानली जातेय. अवघ्या २२ टुर्नामेंटमध्ये तिनं दोन मेजर टायटल आपल्या नावावर केली आहेत. आता आदितीनं आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत गोल्फच्या जगतात भारताची मान अभिमानानं उंचवावी अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा असणार आहे.