मुंबई : भारताचा आक्रमक कर्णधार, जागतीक दर्जाचा फलंदाज आणि सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवत भारताला वर्ल्ड रेकॉर्ड जवळ नेलं आहे. इंग्लंडने एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सलग नऊ सिरीजमध्ये विजय मिळवला आहे. पण आतापर्यंत एकही भारतीय कर्णधार हे करू शकलेला नव्हता. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी जिंकत भारतीय संघाने सलग सहा कसोटी मालिकांमध्ये विजय आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिका जिंकली आहे. यावेळी कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विराटने सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावत सर डॉन ब्रॅडमन, राहुल द्रविड या मातब्बर खेळाडूंना मागे टाकले होते.


विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल १९ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधलीये. याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १८ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली होती. गावस्करांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९७७ ते १९७९च्या दरम्यान हा रेकॉर्ड केला होता. 


विराटच्या नेतृत्वाखाली अपराजित राहण्याची ही परंपरा २० ऑगस्ट २०१५मध्ये कोलंबो टेस्टपासून सुरु झालीये. यानंतर आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी सामने रंगणार आहेत.