महिलांची `चक दे` कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची
आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे.
सिंगापूर : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. भारतानं चीनला 2-1नं हरवलं आहे. दीपिका ही भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. भारताचे दोन्ही गोल हे दीपिकानंच केले.
13व्या मिनिटाला दीपिकानं पेनल्टी कॉर्नरवरून पहिला गोल केला. यानंतर 44व्या मिनिटाला चीनच्या झोंग मेंगलिंगनं गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. पण निर्णायक वेळी म्हणजेच 60व्या मिनिटाला दीपिकानं पुन्हा एक गोल करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
भारतीय महिलांनी पहिल्यांदाच आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरून इतिहास घडवला आहे. महिलांच्या आधी भारताच्या पुरुष संघानंही आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवून विजय साजरा केला होता.