अजित मांढरे, मुंबई : महाराष्ट्र तहानेनं व्याकूळ असताना, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी मात्र पाणीच पाणी उपलब्ध करून दिली जातंय. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळं यंदाच्या आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग दाटून आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळ विरूद्ध आयपीएल क्रिकेट असा आगळावेगळा सामना आता सुरू झालाय. यंदा आयपीएलच्या मॅचेस महाराष्ट्रात होतील का? असा पेच निर्माण झालाय. कारण आयपीएलविरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका... राज्यात लोकांना प्यायला पाणी नाही आणि आयपीएलच्या २० मॅचेससाठी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये ४० लाख लीटर पाण्याचा अपव्यय होतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. त्याबाबतच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएचे कान उपटले.


काय म्हटलंय न्यायालयानं... 


- आयपीएलपेक्षा नागरिक महत्त्वाचे आहेत. त्यामुळं पाण्याचा गैरवापर करु नका.


- आयपीएल मॅचेस आयोजनाला विरोध नाही. मात्र मैदान जोपासण्यासाठी दररोज ४० लाख लिटर पाण्याचा वापर, हा अपव्यय नाही का?


- मराठवाड्यात इतकी भीषण परिस्थिती आहे की, परभणी आणि लातूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय.


- अशा परिस्थितीत आयपीएल मॅचेस दुसऱ्या राज्यात हलवणं शक्य नाही का?


अशी विचारणा उच्च न्यायालयानं केलीय. आयपीएल मॅचेससाठी पाणी वापरण्याच्या वादावर आता उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  


येत्या शनिवारपासून आयपीएलचा धुमधडाका सुरू होतोय. मुंबई इंडियन्स विरूद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स अशी पहिलीच मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, न्यायालय काय निर्णय घेतं, यावर आयपीएलचं भवितव्य अवलंबून आहे. त्यादृष्टीनं गुरूवारची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.