श्रीलंकेला धूळ चारत भारत अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये
श्रीलंकेला तब्बल ९७ धावांनी धूळ चारत भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारलीये.
मिरपूर : श्रीलंकेला तब्बल ९७ धावांनी धूळ चारत भारतीय संघाने अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारलीये. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी करताना भारताने श्रीलंकेवर दिमाखात विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद २६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या संघाला केवळ १७० धावांपर्यंत मजल मारता आली. ७२ धावांची झुंजार खेळी कऱणाऱ्या अनमोल प्रीत सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचे सलामीवीर झटपट परतल्यानंतर अनमोल प्रीत सिंग, सरर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सावधपणे खेळ करताना संघाला अडीचशेहून अधिक धावांचा टप्पा गाठून दिला होता. हे तिघेही बाद झाल्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला २६७ धावा करता आल्या.
श्रीलंकेसमोर हे आव्हान फार मोठे नव्हते. मात्र भारतीय गोलदाजांना मिरपूरच्या खेळपट्टीवर जबरदस्त खेळ करताना श्रीलंकेचे डाव झटपट गुंडाळला. त्यांच्याकडून केवळ कमिंदू मेंडिसने ३९ आणि शम्मू अशन यांनी ३८ धावा केल्या. इतर फलंदाज फ्लॉप ठरले. भारताकडून मयांक डागरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.