घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड
कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे.
मुंबई: कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे. मुंबईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड. 175 रनचा पाठलाग करताना रोहितनं 49 बॉलमध्ये 68 रन बनवल्या तर पोलार्डनं 17 बॉलमध्ये 51 रन बनवल्या. पोलार्डच्या या इनिंगमध्ये 6 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता.
याआधी मुंबईनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. कोलकत्याचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पानं चांगली सुरुवात करुन दिली. उथप्पानं 20 बॉलमध्ये 36 रन तर गंभीरनं 45 बॉलमध्ये 59 रन केल्या. त्यानंतर सुर्यकुमार यादव (21) आणि आंद्रे रसेलनं(22) कोलकत्याचा स्कोअर 174 पर्यंत पोहोचवला.
या विजयामुळे मुंबईनं आपलं घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवरचा शेवट गोड केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यामुळे न्यायालयानं राज्यात होणाऱ्या मॅच बाहेर खेळवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता मुंबईच्या वानखेडेवर होणाऱ्या मॅच राजस्थानमधल्या जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहेत.
कोलकत्याविरुद्धच्या विजयामुळे आठ पॉईंट्ससह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पहिल्या क्रमांकावर 10 पॉईंट्ससह गुजरात लायन्स एक नंबरवर तर कोलकता नाईटरायडर्स 8 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.