नवी दिल्ली : 'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या एका चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल. मध्यप्रदेशातल्या इंदौरमधील नऊ वर्षाच्या अनादि तागडेने क्रिकेटच्या जगात आपला इतिहास रचला आहे. या नऊ वर्षाच्या अनादिची अंडर- १९ महिला क्रिकेटमध्ये निवड झाली आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं वयाच्या १५ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. परंतु अनादिने तर वयाच्या नवव्या वर्षातच क्रिकेटच्या विश्वात पदार्पण केलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनादि क्रिकेटर ईशांत शर्माला आपला आयडियल मानते. तीने पहिल्यांदाच ट्रायल मॅचमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यात तिची निवडही झाली. चौथीमध्ये शिकणारी अनादि वेगवान गोलंदाजही आहे. तिची गोलंदाजी बघून निवडकर्तेही हैरान झाले होते. तिची कामगिरी बघून एवढ्या लहान वयातही तिची निवड करण्यात आली.


अनादिला क्रिकेटचा वारसा तिच्या आईकडून मिळाला आहे. तिची आई एक चांगली क्रिकेटर होती. मुलीच्या प्रशिक्षणासाठी कुणी चांगला कोच मिळाला नाही म्हणून तिने स्वत:च तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. बेसिक प्रशिक्षणानंतर त्यांनी अनादिला 'हॅप्पी वंडर्स क्लब'मध्ये भरती केले.


अनादिचे वडील अनुराग तागडे यांचा परिवार संगीत कलेशी जोडलेलं आहे. परंतु अनादिला मात्र तिच्या आईप्रमाणे क्रिकेटमध्ये आवड आहे. तीने आपल्या वडिलांकडे इंदौरमध्ये झालेल्या आयपीयल मॅच बघण्याचा हट्ट केला. तिला तिकडे नेले असता तीचे फक्त ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर लक्ष होते. गोलंदाजी करताना तो फिल्डींग कशी लावतो याकडे ती लक्ष ठेवून होती असे तिच्या बाबांचे म्हणणे आहे.


तसेच हार्दिक पांड्याची ती मोठी फॅन आहे. त्याची बॅटिंग, बॉलिंग, फिटनेस तिला आवडतात. हार्दिक बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली करतो. त्यासोबत तो फिटही आहे. आपल्यालाही त्याच्यासारख बनायचंय, असं अनादि म्हणते. तिला सचिनला भेटण्याची इच्छा आहे. तिची आईही सचिनची फॅन आहे. अनादिच्या वडिलांचं म्हणण आहे की, तिच्या आईने त्यांच्यासोबत लग्न केलं त्याला कारणही सचिनच आहे. कारण त्यांचा आणि सचिनचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. तसेच त्यांच्या वडिलांचे नावही सारखेच आहे.


अनादिचे वडिल पुढे म्हणाले की, अनादि क्रिकेट चांगले खेळते परंतु ती खूप लहान आहे, त्यामुळे तिच्या वयासाठी लागणारे हॅंडग्लोव्हज्, बॅट आणि पॅड मिळणे कठीण असते. तसेच अनादि बॅटिंगही चांगली करते परंतु ती लहान असल्याने समोरील गोलंदाज तिला बॉल टाकायला माघार घेतात. अनादि चांगली गोलंदाज आहे आणि ती एक दिवस राष्ट्रीय टिममध्ये दिसेल, असा विश्वास या चिमुकल्याच्या चाहत्यांना आहे.