हरारे : भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेटरला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण या प्रकरणामध्ये कोणताही भारतीय क्रिकेटर नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. झिम्बाब्वेतल्या माध्यमांमध्ये या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकन देशामधल्या भारताच्या राजदुतांनी या खेळाडूची अटक रोखण्याचा प्रयत्न केला असल्याच्या दावा झिम्बाब्वेतल्या माध्यमांनी केला होता. यामध्ये कोणी भारतीय क्रिकेटर नसला तरी आता या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. 


बलात्काराच्या आरोपाखाली ज्या व्यक्तीला अटक झाली आहे, ती व्यक्ती या सीरिजमधल्या प्रायोजकांशी जोडली गेलेली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अटक केलेल्या या व्यक्तीनं बलात्कार केल्याचे आरोप फेटाळले आहेत, तसंच माझी डीएनए टेस्ट करा असं आव्हानही त्यानं केलं आहे. या व्यक्तीचं नाव मात्र अजूनही समजू शकलं नाही. 


बीसीसीआयनं मात्र या वादावर बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची पहिले सत्यता पडताळावी लागेल. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे.