पुणे : ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना अद्याप पदक मिळाले नसले तरी, एका १० वर्षांच्या चिमुकल्या खेळाडूने देशासाठी सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्कृती वानखेडे असे या चिमुकल्या खेळाडूचे नाव आहे. संस्कृतीने कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. श्रीलंकेत ३० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा झाली. 


राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दहा वर्षांखालील गटात तिने सुवर्ण पदक जिंकले आहे. नऊ राऊंडनंतर आणि चार देशांच्या खेळाडूंना धूळ चारत तिने ही कामगिरी केली आहे. संस्कृती मूळची अकोला जिल्ह्यातील आहे. तिचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. 


सध्या ती पुण्यात बुद्धीबळ याचे प्रशिक्षण घेत आहे. तिने याआधी देखील देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिने आठव्या वर्षी आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले. वयाच्या तीन वर्षांपासून संस्कृती चेस खेळात आहे. पुण्यातील बार्टी संस्थेने तिला मदतीचा  हात दिला आहे. बार्टीच्या मदतीनेच तिचे पुण्यातील प्रशिक्षण सुरु आहे. तसेच परदेशात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देखील बार्टी तिला मदत करत आहे.