मेघा कुचिक, मुंबई : आज १५ मे... जागतिक कुटुंब दिन... यानिमित्तानं आम्ही आपल्याला एका अशा कुटुंबाचा परिचय करून देणार आहोत की ज्या कुटुंबान कबड्डी या खेळासाठी खूप मोठं योगदान दिलाय. विशेष म्हणजे आई-वडिल आणि मुलगा या तिघांलाही शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आहे शेट्टी कुटुंब... कबड्डीसारख्या देशी खेळात या कुटुंबान खूप मोठ योगदान दिल आहे. कबड्डी हा या कुटुंबाचा जणूकाही प्राण आहे. कबड्डी या खेळासाठी शेट्टी कुटुंबियांनी स्वतःला वाहून घेतलय. म्हणूनच एकाच कुटुंबात एकाच खेळासाठी तिघांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात येणार हे महाराष्ट्रातील पहिलं कुटुंब ठरलंय. याचा नक्कीच या कुटुंबाला अभिमान वाटतो.


वडील जया शेट्टी : माजी कबड्डीपटू आणि संघटक


जया शेट्टी कबड्डी क्षेत्रातील एक मोठं नाव... कबड्डी खेळाडू, कबड्डी संघटक, कबड्डी पंच, कबड्डी समालोचक, कबड्डी मॅटवर आणणारे पहिले कबड्डी संघटक अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी कबड्डीची सेवा केली आहे. जया शेट्टी यांच्या पुढाकारामुळेच मुंबईत विश्वचषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांच्या या कार्यासाठी १९९४ मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 


आई छाया बांदोडकर-शेट्टी : माजी कबड्डीपटू


त्यांची पत्नी छाया बांदोडकर-शेट्टी या तर आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असून त्या कबड्डी क्षेत्रात वाघिण म्हणून ओळखल्या जात असत. अष्टपैलू आणि चढाईत माहीर असलेल्या छाया शेट्टी यांनी तब्बल नऊ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलाय. त्यांना १९७४ मध्ये शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 


मुलगा : गौरव शेट्टी, कबड्डीपटू  


जया आणि छाया यांचा मुलगादेखील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असून त्यांन विश्वचषक आणि आशियाई स्पर्धांमध्ये भाग घेतलय. त्याला २००७ मध्ये शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं.


मुलगी : गौरी शेट्टी, बास्केटबॉल खेळाडू


याखेरीज जया आणि छाया यांची मुलगी गौरी शेट्टीदेखील बास्केटबॉलची राष्ट्रीय खेळाडू आहे. क्रीडाक्षेत्रात त्यातही कबड्डीसारख्या देशी खेळासाठी एवढं मोठं योगदान देणाऱ्या शेट्टी कुटुंबाच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.