मुंबई: आयपीएलचा यंदाचा सिझन सुरु होऊन 12 दिवस आणि 14 मॅच झाल्या आहेत. पण यंदा मात्र आयपीएलचा म्हणावा तसा रोमांच आणि उत्सुकता पाहायला मिळत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी आयपीएलवेळी होणारे वाद, यंदाच्या वर्षी निलंबित झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स तसंच टी 20 वर्ल्ड कपनंतर लगेच आयपीएल सुरु झाल्यामुळे क्रिकेटचा झालेला ओव्हरडोस ही आयपीएलची उत्सुकता कमी व्हायचं कारण असल्याचं बोललं जात आहे. 


पण पहिला बॉल पडायच्या आधीच आयपीएलचा निकाल लागतोय का आणि त्यामुळेच आयपीएलची उत्सुकता कमी झाली आहे का ? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे पहिल्या 14 मॅचमध्ये लागलेले निकाल.


आत्तापर्यंत झालेल्या 14 मॅचमध्ये 13 मॅच या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीमनं जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये झालेली मॅच याला अपवाद ठरली. या मॅचमध्ये पाठलाग करणाऱ्या हैदराबादचा 45 रननी पराभव झाला. याही मॅचमध्ये वॉर्नरनं टॉस जिंकून बैंगलोरला पहिले बॅटिंगला पाठवलं होतं. 


जवळपास सगळ्याच टीमचे कॅप्टन टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेत आहेत. आतापर्यंत झालेल्या 14 मॅचपैकी फक्त चार मॅचमध्ये टीमनी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या चारही मॅचमध्ये आधी बॅटिंग केलेल्या टीमचा पराभव झाला. 


रात्री स्टेडियमवर पडणाऱ्या दवामुळे बॉलरना बॉलिंग करणं कठीण होतं, त्यामुळे रनचा पाठलाग करणं सहज शक्य होत असल्याचं सगळ्याच टीमचे कॅप्टन आणि कोचनी बोलून दाखवलं आहे. 


त्यामुळे टॉसवरच मॅचचे निकाल ठरणार असतील, तर आयपीएल प्रशासनाला मात्र या गोष्टींचा विचार करणं भाग पडणार आहे.