मुंबई: तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीनं आयपीएलच्या या सिझनमध्ये सचिन तेंडुलकर, क्रिस गेल आणि सुरेश रैनाचा सर्वाधिक रनचा रेकॉर्ड तोडला आहे. आणि आता कोहली ब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या या सिझनमध्ये कोहलीनं सर्वाधिक रन बनवून क्रिस गेल आणि मायकल हसीचं 733 रनचं रेकॉर्ड आधीच तोडलं आहे. आता कोहलीचं लक्ष असेल ते ब्रॅडमनचं 1930 च्या ऍशेज सीरिजमधलं 974 रनचं रेकॉर्ड तोडणं. 


ब्रॅडमननं पाच मॅचच्या या सीरिजमध्ये 139.14 च्या सरासरीनं चार सेंच्युरींच्या मदतीनं 974 रन केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाच्याच ग्रेग चॅपलनं 1981-82च्या बेंसन अँड हेजेस सीरीजमध्ये 14 मॅचमध्ये 68.60 च्या सरासरीनं 686 रन बनवल्या होत्या. यामध्ये एक सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरीचा समावेश होता. 


या आयपीएलमध्ये कोहलीनं 13 मॅचमध्ये 155.01 च्या स्ट्राईक रेटनं 865 रन बनवल्या आहेत. यामध्ये चार सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. या आयपीएलमध्ये कोहली आणखी एक मॅच खेळणार हे निश्चित आहे. पण कोहलीची आरसीबी टीम जर ही मॅच जिंकली तर प्ले ऑफमध्येही त्यांना खेळायची संधी मिळेल. त्यामुळे ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड तोडण्यासाठी कोहलीच्या हातात आता कमीत कमी एक तर जास्तीत जास्त चार मॅच आहेत.