मुंबई : दबावाखाली आणि कठीण परिस्थितीत विराटची खेळी उत्तम असते असे म्हणत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांनी कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटचा सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली हा क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस असल्याचे विधान इम्रान खान यांनी केले आहे. संकट काळात विराट हा सचिनपेक्षा कितीतरी पटीने चांगला खेळतो असे सिद्ध होते, असे इम्रान खान यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.


क्रिकेटमध्ये अनेक युग आपण पाहिले. ८० च्या दशकात विवियन रिचर्ड्स होते, त्यानंतर ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरने आपल्यातील कौशल्य सिद्ध करून दाखवले. मी आजवर ज्या खेळाडूंना पाहिले आहे त्यामध्ये विराट कोहली हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो दोन्ही पायांचा उपयोग करून मैदानाच्या चारही बाजूंना उत्कृष्टरित्या खेळतो, असे इम्रान खान म्हणाले. विराटकडे आक्रमकपणा असला तरी त्याच्याकडे परिस्थिती हाताळण्याची कला उत्तम आहे. परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामुळेच तो सचिनपेक्षा उजवा ठरतो, असेही खान पुढे म्हणाले.


जेव्हा खडतर परिस्थिती निर्माण होते, त्या काळात कोहली चांगली खेळी करतो. सचिन मात्र बिकट परिस्थितीत कोहलीप्रमाणे परिस्थिती हाताळत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.