मुंबई : केरळ राज्यातील शिजू नावाच्या एका बस कंडक्टरची सध्या फेसबूकवर खूप चर्चा आहे. साध्या कंडक्टरची इतकी चर्चा का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण, शिजू खरंच वेगळा आहे. सर्वांकडे सहजपणे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा त्याने लोकांसाठी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील थाचोट्टूकावू नावाच्या एका लहानश्या भागात राहणारा ३९ वर्षीय शिजू केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये कंडक्टरची नोकरी करतो. या बसने दररोज ठरलेल्या वेळेस अनेक प्रवासी प्रवास करतात. या रोजच्या प्रवाशांसाठी त्याने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलेत. 


या ग्रुपमध्ये तो दर काही मिनिटांनी बस कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा मेसेज टाकतो. दररोज प्रवास करणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे बस आपल्या बसस्टॉपवर यायला किती वेळ आहे याची माहिती मिळते. त्याप्रमाणे हे लोक आपापल्या घरातून निघून स्टॉपवर जाऊन उभे राहतात.


हल्ली व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीये. मात्र फारच कमी लोक या तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करतात. शिजू एका मानवी जीपीएस सारखे काम करतो ज्याचा फायदा दररोज शेकडो प्रवाशांना होतो. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने यासंबंधीची एक पोस्ट फेसबूकवर टाकली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे.