नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरदार वर्गाचं या बजेटकडे विशेष लक्ष आहे. आयकराची मर्यादा अडीच लाखांवरुन पाच व्हावी अशी या नोकरदार वर्गाची अपेक्षा आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकराची मर्यादा अडीच लाखांवरुन तीन लाख होण्याची शक्यता आहे. सध्याच्या सेवाकरात वाढ होण्याचीही शक्यता आहे. हा सेवाकर 15 टक्क्यांवरुन 16 ते 18 टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल बिल, फोन बिल, विमान प्रवासासह इतर सर्व सेवा महागण्याची शक्यता आहे. देशात उत्पादन वाढवण्यासाठी शेतक-यांसाठी सरकार विविध घोषणा करण्याची शक्यता आहे. 


कृषी कर्जावरील सूटसह इतर काही महत्त्वाच्या घोषणा जेटली आपल्या भाषणात करु शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी 10 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा सरकार करु शकतं. संरक्षण संदर्भातील तरतूदींमध्ये 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये सरकारकडून गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण साखरेवरील सेस सरकार मागे घेण्याची घोषणा करु शकते. त्यामुळे साखर प्रतिकिलो 1 रुपया 24 पैसे स्वस्त होऊ शकते. याशिवाय गृहकर्ज आणि इतर कर्ज स्वस्त होणार का याकडं सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत.