पावसा... सैराट होऊस ये... आणि झिंग झिंग झिंगाट करून टाक!
जगात कुठल्याही प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची वाट पाहिली नसेल... इतक्या आतुरतेनं सध्या सगळेजण पावसाची वाट पाहत होते... तो आता कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हं दिसू लागली... त्याच पावसाला अगदी हक्कानं दिलेला हा एक छोटासा सल्ला आणि आग्रह...
मुंबई : जगात कुठल्याही प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची वाट पाहिली नसेल... इतक्या आतुरतेनं सध्या सगळेजण पावसाची वाट पाहत होते... तो आता कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हं दिसू लागली... त्याच पावसाला अगदी हक्कानं दिलेला हा एक छोटासा सल्ला आणि आग्रह...
वेशीपर्यंत आलायस... आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस... पटकन माप ओलांड आणि आत ये... गेल्या वेळसारखा कंजूसपणा नको.... यंदा दिल खोलके बरस...
गेली दोन वर्षं तुझ्यासाठी अवघी सृष्टी व्याकूळ झालीय.... तिच्यासाठी धावत ये आणि तिला कचकचून मिठी मार... एका क्षणात तिचा सगळा दाह विरघळून जाईल.
येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये... येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव... तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल... एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील...
ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल, पण तरी पण तिथे थांब... कारण तिचा धनी गेल्यावर पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय... म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा... आणि तिथल्या मातीत रुजून राहा...
मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड... नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड... हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस... धन-धान्यासाठी ये, छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये... पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव...
आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव... सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे... वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमा-गरम भज्यांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये... तर्राट होऊन ये.... सैराट होऊन ये... आणि सगऴीकडे झिंग झिंग झिंगाट करुन टाक....