मुंबई : रिंगिंग बेल या कंपनीनं 251 रुपयांमध्ये लॉन्च केलेल्या फ्रीडम 251 या फोनवरून मोठा गदारोळ झाला होता. आता 28 जूनपासून या फोनची डिलिव्हरी सुरु होईल असा दावा कंपनीनं केला आहे. ज्या ग्राहकांनी फोन विकत घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना फोनची डिलिव्हरी मिळेल असं कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल यांनी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातला सगळ्यात स्वस्त स्मार्टफोनचा दावा करत या कंपनीनं फेब्रुवारीमध्ये या फोनच्या विक्रीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात केली. ही कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. 


हा फोन बुक करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर वेबसाईट विझिट केल्यामुळे ही वेबसाईटही क्रॅश झाली होती. दोन दिवसांसाठी असलेल्या या स्कीममध्ये तब्बल 30 हजार ग्राहकांनी हा फोन बुक केला. 


तब्बल 7 कोटी लोकांनी या फोनसाठी रजीस्ट्रेशन केलं होतं, तर 30 हजार लोकांनी पैसेही दिले होते. सरकारी यंत्रणांकडून सुरु झालेल्या चौकशीमुळे अखेर कंपनीनं ही स्कीम मागे घेतली, आणि या 30 हजार लोकांना त्यांचे पैसे परत दिले होते. 


आता या 30 हजार लोकांना कंपनी या स्मार्टफोनची डिलिव्हरी 28 जूनपासून देणार आहे. ग्राहकांना हा फोन मिळाल्यावर त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत.