मुंबई : एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्काराच्या प्रकरणात अडकलेल्या एका 21 वर्षांच्या मुलाला दिलासा देत न्यायालयानं हा निर्णय दिलाय. ब्रेकअपनंतर या तरुणाच्या गर्लफ्रेंडनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. 


बलात्काराशी निगडीत प्रकरणांमध्ये हायकोर्टाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. न्यायाधीश मृदुला भटकर यांनी दिलेल्या निर्णयानुसार, एखादी शिक्षित तरुणी आपल्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवत असेल, तर तिला आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला हवी. जर कुणी फसवणूक करत मुलीची संमती घेत असेल तर ते प्रलोभन समजलं जाऊ शकतं... काही पुरावे असायला हवेत ज्यातून प्राथमिकदृष्ट्या हे स्पष्ट होऊ शकेल की मुलीची फसवणूक करण्यात आलीय आणि ती शारीरिक संबंध बनवण्यासाठी तयार झाली. या प्रकारच्या प्रकरणांत लग्नाचं वचन 'प्रलोभन' मानलं जाऊ शकत नाही. 


नक्कीच समाज बदलतोय... तरीही त्यावर नैतिकता उजव्या बाजुची ठरते... एखादी मुलगी एखाद्या मुलाशी प्रेमसंबंध ठेवत असेल तर ती विसरून जाते की शारीरिक संबंधात तिचीही मर्जी समाविष्ट असते... त्यानंतर ती आपल्या निर्णयाची जबाबदारी घेण्यापासून मागे हटते, असंही न्यायालयानं म्हटलंय. 


कोर्टाच्या म्हणण्यानुसार, संबंध संपुष्टात आल्यानंतर बलात्काराचा आरोप लावण्याचा प्रकार वाढताना दिसतोय. अशा वेळी न्यायालयाला एका निष्पक्ष नजरेनं दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं... ज्यामध्ये आरोपीचे अधिकारही असतात आणि पीडितांचा त्रासही...


या प्रकरणात आपल्या जुन्या आदेशाचा हवाला देत न्यायालयानं म्हटलं की... जेव्हा एक सज्ञान मुलगी शिक्षित असेल तर तिला विवाहापूर्वी शारीरिक संबंध बनवण्याचे परिणाम माहीत असायला हवेत.