मुंबई : आपल्या बँक अकाऊंटमधून कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करताना चुकून दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले... तर घाबरू नका... तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी चुकून तर कधी चुकीच्या अकाऊंट क्रमांकामुळे तुम्हालाही हा अनुभव आला असेल... ऑनलाईन ट्रान्सफर करत असताना अकाऊंट नंबर दोन वेळा विचारण्यात येतो... पण, एटीएममधून ट्रान्सफर करताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. 


कसे मिळणार पैसे परत... 


अशा वेळी, दुसऱ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले तर त्याची लगेचच बँकेला सूचना द्या... तुमच्याकडून सूचना मिळाल्यानंतर बँक ज्या व्यक्तीच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असेल त्या व्यक्तीला याची सूचना देईल... आणि त्या व्यक्तीकडून चुकीनं ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्याची परवानगी मागेल... जर ती व्यक्ती तयार झाली तर तुम्हाला लगेचच पैसे परत मिळू शकतील. परंतु, त्या व्यक्तीनं पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करू शकता. 


बँकेची जबाबदारी नाही 


दोन्ही अकाऊंट नंबर एकाच बँकेचे असतील तर कमीत कमी वेळात हे पैसे पुन्हा योग्य अकाऊंटमध्ये जमा होतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सनुसार, लाभार्थीच्या खात्याची योग्य माहिती देणं अकाऊंट लिंक करणाऱ्याची जबाबदारी आहे. जर कोणत्याही कारणानं अकाऊंट होल्डरकडून क्रमांक लिंक करण्यात चूक झाली तर याची जबाबदारी बँकेची नसेल. त्यामुळे, चुकीच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्या व्यक्तीनं पैसे परत देण्यास नकार दिला, तर बँक तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला पोलिसांतच जावं लागेल.