महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता?
महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास अडचणीत येऊ शकता, असे विधान केरळ राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषिराज सिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
कोच्ची : जर तुम्ही महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास अडचणीत येऊ शकता, असे विधान केरळ राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषिराज सिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
तुम्ही एखाद्या महिल्यास १४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ रोखून पाहणे हा अपराध असून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे सिंग यांनी म्हटले आणि चर्चेला उधाण आले आहे.
महिलांकडे रोखून पाहणे हा गुन्हा आहे, हे आपल्यापैकी अनेकांना माहितच नाही. पण आतापर्यंत राज्यात अशा पद्धतीचा कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत टीका करताना ते म्हणाले की, अशाप्रकरणी मुलींनी पुढाकार घ्यायला हवा. एखाद्या व्यक्तीने अश्लिल शेरेबाजी केल्यास किंवा स्पर्श केल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लगेच तक्रार दाखल करायला हवी.
दरम्यान, १४ सेकंदांचे वक्तव्य अनेकांना पटले नाही. राज्याचे क्रीडा मंत्री ई पी जयराजन यांनी सिंग यांचा समाचार घेत त्यांनी कायद्याबाबत योग्य ती माहिती ठेवावयास हवी असा टोला लगावला. एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याने, हावभाव आणि कृत्याने महिलेचा अनादर होत असल्यास त्याच्यावर कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
ऋषिराज सिंग यांच्या वक्तव्याचा सोशल मीडीयावरही विरोध केला जात असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. एखाद्या व्यक्तीने १३ सेकंदासाठी महिलेकडे रोखून पाहिल्यास त्याचे काय होईल, गॉगल लावून महिलेकडे पाहिल्यास ती व्यक्ती कशी पकडली जाईल, असे सवाल नेटिझन्सनी सिंग यांना केले आहेत. त्याचसोबत एकाने सिंह यांची खिल्ली उडवत पुढच्यावेळी मी महिलेकडे बघण्यापूर्वी टायमर लावेन असे म्हटले आहे.