फोनची बॅटरी संपत असेल तर करा हे 5 उपाय
स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच बॅटरी लवकर संपत असल्याची समस्या भेडसावत असते.
मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच बॅटरी लवकर संपत असल्याची समस्या भेडसावत असते. कित्येकवेळा चुकीच्या वेळी फोनच्या बॅटरीनं दगा दिल्यामुळे अनेक समस्याही निर्माण होतात. काही सोपे उपाय वापरून फोनची बॅटरी जास्त टिकवता येऊ शकते.
1 फोनच्या स्क्रीनचा ब्राईटनेस ठेवा कमी
कोणत्याही टच स्क्रीन स्मार्टफोनची बहुतेक बॅटरी स्क्रीनच्या ब्राईटनेसमुळेच जास्त संपते. बॅटरी जास्त वेळ टिकवायची असेल तर तुमच्या फोनच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी करा.
2 लाईव्ह वॉलपेपर वापरणं टाळा
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर लाईव्ह वॉलपेपर म्हणजेच अॅनिमेटेड वॉलपेपर ठेवतात. अशा वॉलपेपरमुळे फोनची बॅटरी लवकर संपते, म्हणून लाईव्ह वॉलपेपर वापरण्याचा मोह शक्यतो टाळा.
3 अॅपचं ऑटो अपडेट ठेवा ऑफ
ऍन्ड्रॉईड फोनमध्ये असलेल्या सगळ्याच अॅपना काही दिवसांनी अपडेट करावं लागतं. तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये या अॅपसाठीचं ऑटो अपडेट ऑन ठेवलं असेल तर तुमच्या फोनची बॅटरी आणि इंटरनेटचा डेटा चार्जही जातो. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी ऑटो अपडेट ऑफ ठेवा.
4 ब्ल्यू टूथ आणि वायफाय ठेवा ऑफ
अनेक जण ब्ल्यू टूथ आणि वायफाय ऑन केल्यानंतर ते ऑफ करणं विसरून जातात. यामुळेही फोनची बॅटरी लवकर संपते.
5 अॅप्सचा Sync Interval करा कमी
तुमच्या फोनमध्ये असलेली फेसबूक, ट्विटर, जीमेल, गूगल प्लस, ऑफिस मेल सारखी अॅप्स बॅकग्राऊंडला सुरूच असतात, यामुळे मोठ्या प्रमाणावर बॅटरीचा वापर होतो. हे अॅप तुम्हाला बंद करणं अशक्य असेल तर या अॅप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन Sync Interval कमी करा. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यास नक्कीच मदत होईल.