मुंबई : शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधलीत. त्याच्या गड किल्यांची रचना अतिशय बुद्धीकौशल्याने केलेली असायची. महाराष्ट्राची आणखी एक ओळख म्हणून गड-किल्ल्यांना देखील तेवढंच महत्त्व आहे. असाच एक किल्ला आहे ज्याचं आकर्षण ठरतं ते त्याच्या पायऱ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायऱ्या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला. म्हणून आजही ते अस्तित्वात आहे. पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हा थरार एकदा तरी अनुभवण्या सारखाच आहे. 


नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.


८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखलं जातं.


त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा आणि गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.


१८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला आणि उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ आणि तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात".


खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा आणि प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले सुद्धा पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.