मुंबई : लवकरच देशात गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) अर्थात वस्तू व सेवा कर लागू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, हा प्रकार नक्की आहे तरी काय? असा प्रश्न अजूनही तुम्हाला असेल हा व्हिडिओ पाहा... अभिनेत्री पल्लवी जोशीनं अत्यंत सोप्या शब्दांत जीएसटीचा अर्थ समजावण्याचा हा प्रयत्न केलाय. 


 



एकच केंद्रीय कर होणार लागू


जीएसटी करप्रणाली देशात लागू केल्यानंतर प्रत्येक वस्तू किंवा सेवेसाठी एकच कर भरावा लागणार आहे. याचा अर्थ वॅट, एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्सच्या जागी एकच टॅक्स द्यावा लागणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारला एक्साईज ड्यूटी, सर्विस टॅक्स या माध्यामतून मिळाणारा कर बंद होणार आहे. राज्यांना मिळणारा व्हॅट, मनोरंजन कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स आदी टॅक्स बंद होणार आहेत.


आपल्याला काय फायदा?


जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान असणार आहेत. मग ती कोणत्याही राज्यात खरेदी केली तरी... त्यामुळे नागरिकांनी स्वस्त माल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या शहरात जाण्याची गरज भासणार आहे.


टॅक्सही होणार कमी


आपण सध्या साहित्य खरेदी करताना ३० ते ३५ टक्के रक्कम कराच्या रूपाने देतो. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम २० ते २५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.


व्यापाऱ्यांनाही आपले साहित्य एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास फायदा होणार आहे. जीएसटीमुळे वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत त्यामुळे वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.


राज्यांनाही मिळणार करातील वाटा


जीएसटी आल्यावर राज्याला कराद्वारे मिळणारे उत्पन्न घटण्याची भिती सर्वच राज्यांना होती. खासकरून पेट्रोल, डिझेलवर अनेक राज्यांचं अर्ध बजेट अवलंबून आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलमधून मिळणारा कर आगामी काही वर्षे राज्यांना मिळणार आहे. तसंच यामुळं होणारं राज्य सरकारचं नुकसान केंद्र सरकार भरून काढणार आहे. याशिवाय जीएसटीद्वारे मिळणारा कर राज्य आणि केंद्र सरकार ठरलेल्या टक्केवारीनुसार वाटून घेणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्स चोरी सारखे प्रकार बंद होतील. त्याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होणार आहे.