नागराज, मिथुन आणि मीडियातले सरंजामदार
सैराटचा दिग्दर्शक नागराजवर मीडियातील काही लोकांनी चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) सैराटचा दिग्दर्शक नागराजवर मीडियातील काही लोकांनी चिखलफेक करण्यास सुरूवात केली आहे. सैराट हिट झाल्यानंतर नागराजचं कौतुक करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मीडियावाले आहेत.
पण तुम्हाला माहित नसेल, नागराजचा एक अतिशय मजेदार किस्सा आहे, हा किस्सा तसा मीडियातील डेस्कवरच्या सरंजामदारांमुळे घडून आला आहे. डेस्कवर सर्वच सरंजामदार असतात असं नाही, पण नक्कीच काही डोईजड झालेले असतात.
जे व्यक्तीद्वेष, जात, पक्ष, प्रांत एवढंच नाही, तुमचं दिसणं, यावरही बातमी घ्यायची किंवा नाही हे ठरवत असतात, यात अनेक नागराज दबले जातात. सोशल मीडियामुळे आता असे नागराज डोलू लागलेत. डेस्कवरच्या सरंजामशाहीला तसे आता सोशल मीडियाकडून सुरूंग लावण्यास सुरूवात झाली आहे, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल.
महिला पत्रकार हर्षदा परब यांचा एक किस्सा नुकताच वाचण्यात आला, २०११ साली ग्रामीण भागातील दोन तरूणांना त्यांच्या फिल्मसाठी मुंबईत फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड मिळालं होतं, एक होता 'घनदाट' सिनेमाचा दिग्दर्शक मिथुन चौधरी, आणि दुसरा 'पिस्तुल्या'चा दिग्दर्शक नागराज मंजुळे. मिथुन आणि नागराज तसे मित्रच.
जो फेस नको होता, त्या फेसमागे मीडिया धावतेय...
नागराज दिसण्यात काळासा, एका लहान मुलाला घेऊन तो आला होता, तो लहान मुलगा म्हणजे सूरज पवार, ज्याने पिस्तुल्या, फॅण्ड्री आणि सैराटमध्ये प्रिन्सदादाची भूमिका केली आहे. नागराज-सूरज दोघांचे कपडेही साधेच होते, त्यांचा मित्र मिथुन पत्रकारांना समजावत होता, माझ्या आणि याच्याही फिल्मला अवॉर्ड मिळालाय, माझी आणि याचीही मुलाखत घ्या, पण त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकून फार थोड्या लोकांनी त्यांची दखल घेतली.
हर्षदाने त्याची मुलाखत घेतली, डेस्कवरच्या एकाने ती मुलाखत पाहिली, काळासा नागराज पाहून याला कोण पाहणार, आपल्याला फेस हवा असतो फेस, असं सांगून ती बातमी बाजूला टाकली.
पण आज त्याच फेसमागे मीडिया धावतेय, सैराट हिट झाल्यानंतर, त्या फेसची चमक दुनियेला दाखवण्यासाठी. तर काही त्या फेसवर चिखल उडवण्यासाठी.
मिथुनच्या 'पायवाट'ला राष्ट्रीय पुरस्कार
नागराजचा 'सैराट' हिट झालाय, तर मिथुनच्या 'पायवाट' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, आणि ज्यांना हा फेस दाखवायचा नव्हता असं वाटलं होतं, त्यांच्या करिअरला आता फेस येतोय, काहींच्या करिअरला शिक्षा आणखी मोठी असेल म्हणून कदाचित उशीराही फेस येईल.
सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे मीडियात डेस्कवर सर्वच सरंजामदार नसतात, या दोन्ही दिग्दर्शकांचे आमची 'पिस्तुल्या' आणि 'घनदाट'ची बातमी कधी लागेल, म्हणून फोन येत होते, पण एका रविवारी डेस्कवरच्या एकाने या बातमीचं महत्व समजून घेतलं आणि 'पिस्तुल्या', 'घनदाट'चं यश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.