हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो; नाशिकमध्ये अजितदादांची फटकेबाजी
माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा.
नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाशिकमधील कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दिवसभरात त्यांना बऱ्याच भेटीगाठी आणि बैठका घ्यायच्या आहेत. त्यामुळे अजितदादांनी दिवसाची सुरुवातच लवकर केली. दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सकाळी सातच्या सुमारास उपस्थिती लावली.
यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, मी आज सकाळी इतक्या लवकर कार्यक्रमाला येईन का, अशी चर्चा आमदारांमध्ये होती. मात्र, त्यावर दुसरा म्हणाला, हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो, असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
'मुख्यमंत्री मंदिरासाठी अयोध्येला गेले, तर आपण बाबरी बांधायला जाऊ'
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेची बोलणी सुरु असताना अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत अगदी सकाळी सात वाजताच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याचा उल्लेख अजित पवार यांनी नाशिकच्या कार्यक्रमात केला. आपल्याला सकाळी लवकर कामाला सुरूवात करण्याची सवय आहे. माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं, त्यामुळे माफ करा. पण दहा वाजता मला बैठका आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.
तसेच राज्य सरकार टप्प्याटप्प्याने ६० ते ७० हजार सरकारी पदांची भरती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्याचा दौरा टोपल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होणार आहे. विभागातील पालकमंत्री, मंत्री आणि आमदार खासदार या बैठीकीला उपस्थित असतील.