नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळी पहाणी दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन शेवटच्या टप्प्यात मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना अक्षरश: रात्रीच्या वेळी भेटी देवून पहाणी केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी देवळा, सटाना, मालेगाव, चांदवड आणि नांदगाव या दुष्काळग्रस्त तालुक्याचा दौरा केला. सकाळच्या सत्रात देवळा आणि सटाना तालुक्याचा दौरा आटोपून उशिराने ते मालेगाव तालुक्यात दाखल झाले सोनज गावांची पाहणी करतानाच दिवस मावळला. मात्र, पालकमंत्री महाजन यांनी तशाच स्थितीत दुष्काळी  दौरा पूर्ण केला.  


मालेगाव तालुक्यातील निमगाव, जातपाडे , नांदगाव तालुक्यातील पिंपराळे , हिंगणवाडी येथे तर शेतात न जाताच रस्त्यावरच  पालकमंत्र्यांनी  शेतकर्‍यांच्या भेटी  घेण्यात धन्यता मानली. रात्रीच्या वेळी पालकमंत्र्यांना दुष्काळाची दाहकता काय समजली असेल. 


केवळ नावापुरतीची दुष्काळाची पाहणी करून दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांची एक प्रकारची थट्टाच केली जात असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण  झाली आहे.  रात्री  उशिरापर्यंत  नांदगावच्या तहसील कार्यालयात पालकमंत्री गिरीश महाजन  यांनी आढावा  बैठक घेवून  अधिकार्‍यांना दुष्काळाचे  पंचनामे  करण्याचे  आदेश  दिले आहेत. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या होणार्‍या बैठकीच्या  पार्श्वभूमीवर  पालकमंत्र्यांचा  दौरा  महत्त्वपूर्ण मानला जात आहे.