वाल्मिक जोशी, झी २४ तास, जळगाव : बाप-लेकीच्या प्रेमाची अनेक उदाहरणे आपण पाहिली-ऐकली असतील. मात्र पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील याच भावबंधाची एक कथा आपल्याला भावविवश केल्याशिवाय राहणार नाही. सेवानिवृत्त जवान भागवत पाटील यांचे कोरोनाने अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आपत्ती कोसळली. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रियंका या तिसर्‍या मुलीचा विवाह ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले वडील जगात नसले तरी आपल्या लग्नाला आलेच पाहिजे, ही प्रबळ भावना तिच्या मनात आली आणि वडिलांचा पुतळा लग्नात ठेवत लग्नसमारंभ पार पडला. नांद्रा येथील चार मुलींचे एकटे खंबीर आधारस्तंभ असणारे  माजी सैनिक भागवत पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 


पाटील यांच्या चार मुलींपैकी दोनच मुलींचे लग्न झाले आहे. तिसऱ्या मुलीचं लग्न वडिलांना थाटामाटात करायचे होते. पण ते स्वप्न ते उराशीच घेऊन ते अचानक या कुटूंबातून निघून गेले.  त्यामुळे वडिलांचा हुबेहूब पुतळा बनवून लग्न सोहळ्यात आणण्यात आला, त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.  


वडील आपल्यात असल्याची जाणीव व्हावी म्हणून त्यांचा सुमारे दोन लाख किंमतीचा पुतळा बनवला. त्यानंतर सर्व मुलींनी पाणावलेल्या डोळ्ंयानी वडिलांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मुलींचं वडिलांवरील प्रेम पाहून जमलेल्या सर्व पाहुण्यांना गहिवरुन आले.