`बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..`, नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख
800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.
800 Crore Land Acquisition Scam In Nashik: उद्धव ठाकरे गटाने खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फायद्यासाठी नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याच दाखवून महानगरपालिकेबरोबर जमीनीचे व्यवहार करुन कोट्यवधींचा नफा कमवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यासंदर्भातील कथित पुरावेही दाखवले आहेत.
ठक्कर बिल्डरला नफा 355 कोटींचा फायदा
"2 कोटींची जमीन विकत घेऊन ठक्कर बिल्डरने पालिकेला अधिक किंमतीत विकली," असं राऊत म्हणाले. "नाशिक शहर दत्तक घेण्याची फडणवीसांनी केली होती घोषणा," अशी आठवणही राऊत यांनी केली आहे. ही आठवण करुन देत फडणवीसांना संजय राऊत यांनी संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे. "800 कोटींचं भूसंपादन बिल्डरांच्या नफ्यासाठी करण्यात आलं. महानगरपालिकेने शिंदेंच्या मर्जीतल्या बिल्डरांना 800 कोटी रुपये दिले," असा आरोप राऊतांनी केला आहे. "भूसंपादनात मोठा घोटाळा झाला आहे. अनेक बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून पालिकेबरोबर व्यवहार केला. यामध्ये ठक्कर बिल्डरला नफा 355 कोटींचा फायदा झाला. पालिका अधिकाऱ्यांना 12 कोटींचा फायदा झाला. मनवानी 53 कोटींचा फायदा झाला. जमीनी 5 पटीनं किंमती वाढून विकत घेतल्या," असं राऊत म्हणाले.
मनवानी, शाह बिल्डरला फायदा
"नाशिक पालिकेत लूट दरोडेखोरी सुरु आहे. शिंदे, नगरविकास खात्याचे अधिकारी लाभार्थी असून ठक्कर, मनवानी, शाह बिल्डरला फायदा झाला आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचाऱ्यांसोबत फिरतात," असा आरोप राऊत यांनी केला.
फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केलेली
"विकासासाठी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी 2017 ला केली. पुढे काय झाले? लुटालूट! भूसंपादन घोटाळा 800 कोटींचा. एकनाथ शिंदे व त्यांचे बिल्डर साथीदार या घोटाळ्यातील लाभार्थी आहेत," असं राऊत यांनी सोमवारी रात्री आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलं होतं. या पोस्टबरोबर त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नामफलकावरील नाशिक शब्दातील 'ना' अक्षर पडल्याचा फोटो पोस्ट केला आहे.
देवेंद्रजी काय कारवाई करणार?
"नशिक भूसंपादन घोटाळा 800 कोटींचा आहे. जनतेच्या पैशांची ही सरळ लूट आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या 800 कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच "लुटलेल्या एक एक पैस्याचा हिशोब द्यावाच लागेल," असं राऊत म्हणालेत. या पोस्टबरोबर राऊत यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राचे फोटो पोस्ट केलेत.
होर्डिंगवरही बोलले
बेकायदेशीर होर्डिंग मुंबईला लागलेला शाप आहे, असंही राऊत काल घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिगं दुर्घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले. बीएमसीची ज्यांनी लूट केली ते आता भाजपामध्ये आहेत, असंही राऊत म्हणाले.