नाशिकमध्ये `कोथरूड पॅटर्न`; बाळासाहेब सानपांना विरोधकांचा पाठिंबा
नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेच्या उमेदवाराची माघार
नाशिक: उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रंजक घडामोडी सुरु झाल्या आहेत. यामध्ये नाशिकमधील एका घडामोडीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात कोथरूड पॅटर्नची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. याठिकाणी मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे. यासाठी विरोधकांची छुपी युती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे असलेले बाळासाहेब सानप यांच्या पाठिशी विरोधक आपली ताकद उभी करणार आहेत. आपली पूर्वतयारी झाली नसल्याने माघार घेत असल्याचे अशोक मुतर्डक यांनी सांगितले. मात्र, आता भाजपच्या विरोधात काम करू, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्यात थेट लढत रंगणार आहे.
यापूर्वी कोथरूडमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. याठिकाणी विरोधकांकडून एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी करण्यात आली आहे. यंदा कोथरूडमध्ये भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रिंगणात उतरले आहेत. मात्र, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे कोथरूडमधील लढाई चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांची माघार
नाशिकमध्येही शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून मामा ठाकरे यांची मनधरणी सुरु होती. अखेर या शिष्टाईला यश आले. तसेच नाशिकमधील शिवसेनेचे उर्वरित दोन बंडखोर तीन वाजेपर्यंत माघार घेतील, असा दावा भाऊसाहेब चौधरी यांनी केला.