नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीलगत असलेलं आदर्श गाव टेमली.. या गावापासून पुढे सुरु होतं मध्यप्रदेश राज्य.. त्यामुळे राज्याचं हे शेवटचं टोक. या गावात रहाणारे किरण आणि आनंदा भीमराव मोहने या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, त्या दाम्पत्याचं दुर्देव पहा! ही तीनही मुले जन्मली ती दृष्टिहीन. मात्र, त्या दाम्पत्याने हार मानली नाही. त्यांनी आपल्या तीनही मुलाचं चांगलं पालनपोषण केलं. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं अशक्य काम त्यांनी करून दाखवलं.


प्रवीण आणि सुरेश या त्या दोन मुलांनी धुळे, मुंबई, पुणे, अमरावती अश्या विविध ठिकाणी असलेल्या दृष्टीहीनांसाठीच्या शाळांमधून आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. यथावकाश दोन्ही मुलांना शासनाच्या दिव्यांग कोट्यातून 'शासकीय नोकरी' मिळाली.


मेहनत करून या दोघं मुलांना ''शासकीय नोकरी" मिळाली. पण, आयुष्यभरासाठी सोबती म्हणून त्यांना कुणी 'छोकरी' देईल का? हा प्रश्न होता. इथे कित्येक डोळस मुलांना लग्नाविनाच रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे या दृष्टिहीनांना कोण मुलगी देणार असा सवाल होता.


पण, या दोघांचे नशीब पहा...! मोठा भाऊ सुरेश याचा विवाह अमरावती येथे १० जानेवारी रोजी बैतूल येथील उर्मिला या सामान्य मुलीशी पार पडला. सुरेश शहादा येथे आयडीबीआय बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. मोठा भाऊ बोहल्यावर चढल्यानंतर लहान भावाच्या लग्नसराईची चर्चा होऊ लागली. 



वधू शोध सुरु झाला आणि सामान्य वधूने धाकट्या प्रवीणशी लग्नगाठ बांधली. त्या वधूचं नाव गायत्री. या विवाहाबद्दल ती म्हणते, "अंध असल्यामुळे काही होत नाही. त्या व्यक्तीचे हृदय शुद्ध असावे. प्रवीणशी बोलले. त्यावेळी तो आयुष्यभर आपल्यासोबत असेल असे वाटले. त्यामुळे या लग्नासाठी संमती दिली. लग्नानंतर आम्ही दोघे नेहमी आनंदी राहू. मी त्यांना आयुष्यभर साथ देईन, माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन."



प्रवीण हा मध्य रेल्वेत खलाशी म्हणून कार्यरत आहे. प्रवीण आणि सुरेश या दोन्ही दृष्टीहीन मुलाचे लग्न डोळस मुलींशी झाले. या दोघांची लहान बहीण शिक्षण घेत आहे. मात्र, या लग्न नव्हे तर "नेत्र"दीपक सोहळ्यामुळे मोहने कुटुंबियांच्या आनंदाला पारावर राहला नाही. आपल्या दृष्टिहीन मित्राच्या या आनंद सोहळ्यात त्याचे अनेक दृष्टिहीन मित्रदेखील बँडच्या तालावर थिरकत सहभागी झाले होते.