जन्माला आलेली मुलगी अपशकुनी! नराधम बापानेच केली हत्या अन्...
कनीज फातेमा अपशकुनी आहे म्हणून तीचा छळ बापाने केला.
वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको वसाहतीत जावेद अख्तरने स्वतःच्या पोटच्या मुलीची हत्या करून कब्रस्थानात दफन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कनीज फातेमा अपशकुनी आहे म्हणून तीचा छळ करीत तिची हत्या जावेदने केली आहे.
काय घडलं नक्की?
शहरातील प्रिंप्राळा हुडको परिसरात तीन महिन्यांपासून राहायला आलेल्या जावेद अख्तर शेखने मोठी मुलगी कनीज फातेमा हिला अपशकुनी असल्याने छळ करून जीवे ठार मारून कब्रस्थानात दफन केल्याची खळबळजनक घटना जळगावात उघडकीला आली. मुलीच्या आजी आजोबा आणि मामा यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात आईवडीलांवर संशयास्पद मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. सकाळी दफन केलेल्या कब्रस्थानातून मृतदेह काढून पंचनामा केला असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला आहे.
केमिस्टचे काम करणाऱ्या जावेद अख्तर शेख जमालोद्दिन हा पत्नी व कानीज फातेमासह राहतो. कानीजच्या जन्मानंतर काही दिवसांत दिवसांत जावेदच्या आईचे निधन झाल्याने कनीज फातेमा नावाची ही मुलगी कुटुंबासाठी अपशकुनी आहे, असा समज होऊन जावेदने तिचा छळ सुरू केला होता, असे तिचा मामा व तक्रारदार अजहर अली शौकत अली यांनी आरोप केला आहे.
नातेवाईकांनी पोलिसांत केली तक्रार
२५ एप्रिलच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास जावेदने घरमालक आरीफ खान यांना झोपेतून उठवले आणि आपल्या मोठ्या मुलीचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले. मामाला हा सगळा प्रकार कळाल्यानंतर त्याने भाचीवर केलेल्या छळाबाबत पोलीसात तक्रार अर्ज केला.
कनीजच्या आईवडीलांची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि दफन केलेल्या कब्रस्थानातून मृतदेह काढून पंचनामा केला असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.