Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; `या` मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना
Cidco lottery 2024 : काही दिवसांपूर्वीच म्हाडाकडून मुंबईतील अँटॉप हिल, गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर या आणि इतर काही भागांमधील सदनिकांमध्ये असणाऱ्या घरांसाठीची योजना प्रसिद्ध केली. (Mhada Lottery)
इथं म्हाडानं गृहयोजना प्रसिद्ध करत तिथं या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी सोडत केव्हा जाहीर होईल यासंदर्भातील माहिती देत त्यासाठीची तारीखही जाहीर केली.
गणेशोत्सवादरम्यान म्हाडाच्या या सोडतीची घोषणा होणार असल्यामुळं इच्छुकांमध्ये उत्साह आणि कुतूहल असतानाच आता सिडकोच्या नव्या गृहयोजनेसंदर्भातील महत्त्वाची माहितीही समोर आली आहे.
सिडकोची योजना लांबणीवर पडली अशी चर्चा सुरू असतानाच आता मात्र या योजनेसाठी मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, सिडको महामंडळाच्या वतीनं कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर 902 घरांसाठी योजना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार 27 ऑगस्ट 2024 रोजी ही योजना जाहीर होणार असून या योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 38 आणि सर्वसामान्य गटासाठी 175 अशा एकूण 213 सदनिका या योजनेचा भाग असतील.
खारघरमध्ये सिडकोच्याच स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील 689 घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे. ज्यासाठी इच्छुकांनी अर्ज करणं अपेक्षित असेल.
रेल्वे स्थानकं, रस्ते, मेट्रोसेवा या आणि अशा अनेक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या परिसरांमध्ये ही घरं असल्यामुळं सिडकोच्या या घरांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय होऊ घातलेल्या आंततराष्ट्रीय विमातळ प्रकल्पाचं अंतर या संकुलांपासून नजीक असल्यामुळं इथ बदलच्या शहराचे साक्षीदार होण्याची संधी योजनेतील विजेत्यांना मिळणार आहे हे नाकारता येत नाही.