Loksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! `ही` आकडेवारी पाहाच
Loksabha Election 2024 : महाराष्ट्रामध्ये मागील बऱ्याच काळापासून भाजपनं जबर पकड मिळवली असून, यामध्ये सिंहाचा वाटा ठरला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा.
विविध मतदारसंघ आणि सर्व वयोगटातील मतदारांच्या मनात त्यांच्याप्रती असणारा विश्वास पाहता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढली आहे. महायुतीच्या उमेदवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सभावर भर दिला जात आहे.
पूर्व विदर्भात आतापर्यत देवेंद्र फडणवीस यांच्या 20 पेक्षा जास्त सभा पारही पडल्या आहेत. किंबहुना या निवडणुकीच्या धामधुमीत ते राज्यात तब्बल 125 सभा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पक्षातील डॅमेज कंट्रोल करत असतानाच फडणवीसांकडून सभांचा धडाकाही अविरत सुरु ठेवण्यात आला आहे. लोकसभेच्या भाजप पक्षाशिवाय महायुतीतील एनसीपी, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठीही फडणवीस यांच्याच सभा व्हाव्यात यासाठी नेतेमंडळी, खुद्द उमेदवार आणि कार्यकर्तेही आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच प्रचार संपण्याच्या दोन दिवसांपूर्वी 20 हून अधिक सभा पार पडल्या आहेत. या टप्प्यातील मतदानाआधी आणखी सभांचं नियोजन असून तिथंही फडणवीस हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांची जोरदार मागणी देशभरातील लोकसभा उमेदवारांकडून होत असली तरीही राज्यातील सर्वाधिक जास्त मागणी फडणवीस यांच्या सभेसाठीच पाहायला मिळत आहे.
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र या घोषणा कार्यकर्ते आणि भाजप समर्थक करत असून, ही एकंदर स्थिती पाहता महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी यांच्यामागोमाग देवेंद्र फडणवीसच भाजपचा चेहरा असून, त्यानंतर इतर दिग्गजांची नावं येतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.