मान्सून आज केरळमध्ये होणार दाखल, राज्यात कधी बरसणार पाऊस?
सक्रीय झालेला मान्सून आज केरळात धडकण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये काही काळ रेंगाळल्यावर आता मान्सूनने वेग पकडलाय.
मान्सून वेगाने नैऋत्येकडे सरकत असल्यामुळे आजच मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो.
मान्सून 4 जूनला केरळात येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. तो अंदाज अचूक सिद्ध होण्याचे संकेत आहेत.
सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाल्याचं आयएमडीने म्हटलंय.
मान्सून आज केरळात दाखल झाल्यास कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार प्रिमान्सून सरी कोसळतील.
तर महाराष्ट्रात वरुणराजाचे 10 जूनला आगमन होणार आहे, असी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
यंदा राज्यात सरासरीच्या 95 टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागने वर्तविली आहे.
राज्यात जून, जुलैमध्ये कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा 100 टक्के पावसाची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे.
एकीकडे राज्यात मान्सून उशिराने दाखल होणार असल्यानं वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची आजही सुटका होणार नाहीए.
आज मुंबईत कमाल तापमान 35 तर किमान तापमान 30 पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.