चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos
छत्रपती संभाजीनगरमधील छावणी भागात आज पहाटेच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अग्नीकांडामधून 9 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कापडाच्या दुकानाला आग लागली त्यामध्ये एका इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावली होती.
इलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा चार्जिंगदरम्यान स्फोट झाल्याने ही भीषण आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छावणी परिसरामधील असलम टेलर या दुकानाला पहाटे 3 च्या सुमारास आग लागली. या दुकानात चार्जिंगला लावण्यात आलेल्या ईलेक्ट्रीक बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं प्रथदर्शनी स्पष्ट होत आहे.
इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानाला लागलेल्या आगीमुळे दुकानाच्या वरच्या बाजूला राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. या आगीमुळे मरण पावलेल्यांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांच्या पत्नी, 2 लहान मुले आणि आई यांच्या समावेश आहे.
आगीत मरण पावलेल्या सदर कुटुंबाचा शहरामध्ये दुधाचा व्यवसाय होता. हे कुंटुंब या फॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. पहाटे लागलेल्या या आगीने संपूर्ण कुटुंबावर घाला घातल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इमारतीचे मालक राहत होते. मात्र आग लागल्याचं वेळीच लक्षात आल्याने सुदैवाने ते वाचले. पहिल्या मजल्यावरही 7 ही लोकांना वाचवण्यात यंत्रणांना यश आलं. सदर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 2 लोक राहत होते. या दोघांनाही वाचवण्यात यश आलं आहे.
दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाला आग लागल्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे या भीषण आगीत हे संपूर्ण कुटुंब होरपळलं.
दुकानाला आग लागल्याची बातमी समजल्यानंतर पहाटेपासूनच घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती.
पहाटे कापड दुकानाला आग लागल्याचं सर्वात आधी शेख मेनुद्दीन नावाच्या स्थानिक व्यक्तीने पाहिले. त्याने लगेच फोन करुन संबंधित यंत्रणांना यासंदर्भातील महिती दिली.
तातडीने अग्निशामन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या मदतीने 9 जणांना या इमारतीमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
जेसीबीच्या सहाय्याने जळलेल्या दुकानातील मलबा बाजूला काढण्यात आला.
दुकानाला आग लागून 7 जणांचं संपूर्ण कुटुंब दगावल्याची घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोठा स्फोट होऊन दुकानाला आग लागल्याचं दिसत आहे.
या घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संपूर्ण परिसराची पहाणी केली. घटनेची देताना पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी, "संभाजीनगरमध्ये पहाटे तीन-चारच्या सुमारास ही घटना घडली. छावणी भागातील असलम टेलर या टेलरिंग शॉपला बॅटरीच्या गाडीमुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे," असं सांगितलं.
"या दुकानातील कपड्याचा माल पूर्णतः जळून खाक झाला आहे. दुकानाच्या वरील मजल्यावर राहत असलेल्या कुटुंबाचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. यात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे," असंही लोहिया म्हणाले.