Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, `हाय टाईड`चा इशारा
पावसामुळे मुंबई आणि नवी मुंबईत हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उखाड्यामुळे हैराण झालेले मुंबईकर काहीसे सुखावले आहेत. नवी मुंबईमध्येही पावसाने हजेरी लावली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे.
मुंबईत सकाळी झालेल्या पावसानंतर आता सर्वत्र आभाळ भरुन आले आहे. मुंबईच्या स्कायलाईनवर काळ्या ढगांची दाटी झालीय. मुंबईत काही भागात पावसाच्या सरीही कोसळत आहेत. मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा आहे. कधी एकदा मुंबईकरांचा लाडका पाऊस कोसळतो अशी आस मुंबईकरांना लागलीय. त्यातच आता मुंबईवर काळ्या ढगांनी दाटी केल्यामुळे दिलासा मिळालाय.
पालघरमध्येही पावसाची रिमझीम सुरू आहे. रात्रीपासूनच पालघर जिल्ह्यात पाऊस पडतोय. तर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पावसाच्या सरी येत आहेत. पूर्व उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. मानखूर्द, चेंबूर, सांताक्रूझ लिंक रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, बांद्रा या भागात पाऊस झाला. सकाळी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज मान्सून दाखल होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता आहे. सामान्यतः ढगाळ आकाश राहिल. तसेच आजची भरतीओहोटी पाहता समुद्रात 3.92 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच उद्याही 3.18 मीटर लाट येण्याची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या दिवशी 1.84 मीटरची लाट येण्याची शक्याता आहे.
मान्सून अजूनही कोकणातच रेंगाळलेला आहे. मुंबईत मान्सून वारे दाखल झालेले नाहीत. मात्र मुंबईत मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरूवात झालीय. मुंबईत सकाळपासूनच ढगांनी दाटी केलीय. दादर, बांद्रापासून दक्षिण मुंबईपर्यंत सर्वत्र काळे ढग पाहायला मिळत आहेत. अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे मुंबईत काहीसा गारवा पसरला आहे.
कोकणात मागील काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा सुरू होती, मात्र काल दुपारपासून कोकणात पावसाने जोर धरलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडीतील काही भागात पावसाचा जोर वाढलाय. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावलाय. काल दुपारनंतर तसंच रात्री काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस पडला.
कोल्हापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा कोल्हापूरकर करत होते अखेर तो पाऊस दाखल झाला आहे. मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यातल्या सर्वच भागांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली.. तेव्हा उकाड्यापासूनही कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय..
पुण्यामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून पुणे आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
खरंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात होत असते. मात्र यंदा पावसाच्या सुरुवातीलाच पावसानं ओढ दिली.
जून महिन्यात आत्तापर्यंत 20.7 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालीय..हे प्रमाण सरासरीपेक्षा 81 टक्क्यांनी कमी आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्रात पावसाची रिमझिम सुरु झाली असून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे.