गोव्यातून किंवा दुसऱ्या राज्यातून दारू मागवताय? आधी हे नियम वाचा
मुळात दारु खरेदी करण्यासाठीसुद्धा देशातील प्रत्येक राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. कुठं मद्यपान आणि विक्रीवर पूर्ण बंदी आहे, तर कुठं फक्त मद्याचा बाटल्या खरेदी करण्याचीच परवानगी आहे. पण, दुसऱ्या राज्यात ही खरेदी केलेली दारू न्यायची कशी? पोलिसांनी पडकल्यास पुढं काय?
भारतातील गुजरात आणि बिहार ही अशी राज्य आहेत जिथं दारुबंदी लागू आहे. थोडक्यात तुम्ही इथं बाहेरच्या राज्यांतून दारू नेली, तरीही तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
पण, काही राज्यांमध्ये मात्र तुम्हाला खासगी वापरासाठी ठराविक प्रमाणात दारू खरेदी करण्याची परवानगी आहे. पण, ही मर्यादा ओलांडल्यास मात्र तुम्ही शिक्षेस पात्र ठरता.
रेल्वेनं प्रवास करत असताना तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दारूच्या बाटल्या नेऊ शकत नाही. रेल्वे कायदा 1989 अंतर्गत रेल्वेगाडी, रेल्वे स्थानक आणि परिसर, फलाटावर मद्यपानास बंदी असून, इथं तुम्ही मद्याची बाटली नेताना दिसला तरीही ही कायद्याचं उल्लंघन करणारी कृती ठरते.
वरील नियमाचं उल्लंधन केल्यास रेल्वे कायदा 1989 च्या कलम 145 अंतर्गत तुम्हाला 6 महिन्यांचा कारावास किंवा रोख रक्कमेचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.
तुम्ही चारचाकी वाहनानं दारूच्या बाटल्या नेत असाल तरीही ज्या राज्यात तुम्ही आहात तिथले नियम पाळणं बंधनकारक असतं. त्यामुळं तुमच्याकडे आवश्यक परवाना असणं गरजेचं आहे.
विमानातून एखाद्या राज्यातून दारू आणत असाल, तर कोणत्याही प्रवाशाला हँडबॅगमधून 100 मिलीपर्यंतची दारू सोबत नेता येते. देशांतर्गत विमानप्रवासामध्ये उड्डाणादरम्यान मद्यपानास बंदी आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मात्र मद्यपानाची मुभा असते.