`या` नाश्त्याच्या पदार्थांनी द्विगुणित करा पावसाचा आनंद!
पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे या दिवसामध्ये तळकट पदार्थांऐवजी काही हेल्दी पदार्थांची निवड करा. पॉपकॉर्न हा एक टेस्टी पर्याय आहे. तुमच्या आवडीनुसार मसाला पॉपकॉर्न, बटर पॉपकॉर्नचाही आस्वाद घेऊ शकता.
पावसाळ्यात मक्याचा आस्वाद घेण्याची मज्जा काही औरच असते. कॉर्न चाट किंवा मसाला कॉर्न याचा घरच्या घरी तुम्ही आनंद घेऊ शकता. वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी मिसळा. त्यावर लिंबाचा रस आणि चाट मसाला मिसळून झटपट तयार होणारे चाट चविष्ट आणि हेल्दी आहे.
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे व्हायरल इंफेक्शन, सर्दी, खोकल्याचा त्रास बळावू शकतो. यापासून बचावण्यासाठी भाजलेले ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. चहा, कॉफीसोबत हे पदार्थ खाल्ल्याने ते अधिक स्वादिष्ट लागतात.
चहा आणि भजी नेहमी खाऊन कंटाळा आला असेल तर कॉर्न चीज सॅन्डव्हिच किंवा अॅप्पल सॅन्डव्हिचसारख्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवा. घरच्या घरी हे पदार्थ बनवाल तर गरमागरम पदार्थांची लज्जत घेता येईल.
बटाट्याऐवजी रताळ्याचा आहारात समावेश वाढवा. रताळयाचे चिप्स किंवा चाटचा आनंद नक्की घ्या.
(फोटो साभार: सोशल मीडिया/पिनट्रेस्ट)