Walkaway Wife Syndrome : एकत्र राहूनही नसतो पती- पत्नीच्या नात्यातील गोडवा; वैवाहिक नात्यात दुरावा येण्यापूर्वी दिसतात `हे` बदल

Tue, 02 Jul 2024-12:50 pm,

Walkaway Wife Syndrome : 'वॉकअवे वाइफ सिंड्रोम' म्हणजे वैवाहिक नात्यातील एक असा टप्पा जिथं पतीसोबत राहूनही पत्नीच्या वागण्यात बदल येतो. ती सोबत असूनही एकाकी राहत असते. तिचं हास्य हरवलेलं असतं. 

ज्यावेळी वैवाहिक नात्यात काही कारणास्तव वितुष्ट येतं, त्याचवेळी अनेकदा पतीकडून आपल्याला अपेक्षित वागणूक मिळत नसल्याची भावना पत्नीच्या मनात घर करू लागते. पाहता पाहता पत्नीसुद्धा या नात्यात एकाकी पडते आणि इथंच वॉकअवे वाइफ सिंड्रोम डोकं वर काढतो. 

 

ही स्थिती एक अशा परिस्थितीवर भाष्य करते जिथं वैवाहिक नात्यात तणाव असतानाही ते नातं टिकावं यासाठी प्रयत्न करणारी पत्नी अखेर हार पत्करते. पत्नी या निर्णयावर पोहोचण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये पतीचं दुर्लक्ष किंवा एककेंद्री वृत्ती सर्वाधिक परिणाम करताना दिसते. हा काळ तोच असतो जेव्हा वैवाहिक नात्यातून पत्नी भावनिक, मानसिक आणि आर्थिकरित्याही बाहेर पडू इच्छिते. 

 

लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात जी पत्नी मनसोक्त वावरत असते तिच्याच वागण्याबोलण्यात बदल येतात आणि अनेकदा या स्थितीसाठी ती स्वत:ला दोष देऊ लागते. पतीप्रती असणारी तिच्या मनातील ओढ कमी झालेली असते, ज्यामुळं नात्यांचे पाश तोडण्याची भावना तिच्या मनात घर करून जाते. 

पत्नी कोणत्याही गोष्टीचा तगादा लावत नाही, यामुळं अनेकदा पतीला दिलासा मिळू शकतो. पण, तिच्या या वागण्याचा गांभीर्यानं विचार केला जाणं अपेक्षित असतं. पत्नीचं शांत राहणं वैवाहिक नात्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं इथं जोडीदाराशी साधला जाणारा मनमोकळा संवाद अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. 

पती- पत्नीच्या नात्यात येणारा दुरावा गंभीर वळणावर पोहोचल्यानंतर अनेकदा पतीसोबत जवळीक साधण्यापासूनही पती दोन पावलं मागे हटते. नात्यात होणारे हे बदल भविष्यातील वादळाची चाहूल देऊन जातात.

 

वैवाहिक नात्यात येणारा हा दुरावा सुरुवातीला गंभीर वाटत नसला तरीही अनेकदा संवादाअभावी नातं तुटण्याची वेळ येते आणि हा मानसिक धक्का पती आणि पत्नी या दोघांनाही पचवणं कठीण असतं. त्यामुळं नातं कोणतंही असो, नात्यातील तुमची भूमिका कोणतीही असो, संवाद साधला जाणं आणि समस्येवर तोडगा काढणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, सदर प्रकरणी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.) 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link