पुणे: माणूस जेव्हा जनावर बनतो तेव्हा काय होतं याची कल्पना न केलेली बरी. पोटच्या मुलला एका खोलीत त्याच्याच आई वडिलांनी दोन वर्ष बंद केलं होतं. नुसतं बंदच केलं नाही तर सोबत 22 रानटी कुत्री सुद्धा ठेवली होती. 
खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकला माणूसपण हिरावून बसला. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच खोलीत बंद असल्याने आणि सोबतच्या कुत्र्यांमुळे तो माणूस आहे हेच विसरुन गेला होता. ही संतापजनक घटना घडलीय पुण्याच्या कोंडवा परिसरातील कुष्णाई इमारतीमध्ये. 


मुलाची अशी केली सुटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंडवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार, चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या संतापजनक घटनेचा प्रकार पोलिसांना कळला. पोलिसांना हा प्रकार कळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंडव्यातील कुष्णाई इमारतीमधील संबंधित खोलीजवळ पोलीस पोहोचले. घराच्या आतमधून कुत्र्यांच्या भूंकण्याचा खूप आवाज येत होता. घरात शिरणं पोलिसांना कठिण जात होतं. घरात एक दोन नव्हे तर तब्बल 22 कुत्री होती. ही सर्व कुत्रे भटके होते. त्यांची कोणतही नसबंदी झाली नव्हती किंवा त्यांना कोणतही इंजेक्शन देखील दिलं नव्हतं. घराच्या आतमध्ये घाणीचं साम्राज्य होतं. कुत्र्यांची विष्ठा ठिकठिकाणी पडली होती. संपूर्ण घरात दुर्गंधी होती. या दुर्गंधीत आणि 22 कुत्र्यांसोबत एक 11 वर्षांचा चिमुकला होता. मात्र त्याची अवस्था पोलिसांना देखील पाहावत नव्हती. मुलाची अवस्था दयनीय होती. आहार नसल्याने शरीर क्षीण झालं होतं. मुलाची वर्तणूक एखाद्या पशू प्रमाणे होती. मुलाला पाहाताच पोलिसांनी आणि चाईल्ड लाइनने मिळून तात्काळ त्या मुलाची सुटका केली . मुलाला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं. 


निर्दयी आई वडिलांची रवानगी तुरुंगात


या मुलाच्या निर्दयी आई वडिलांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.  स्थानिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार या मुलाचे आईवडिल विक्षिप्त असल्याचं कळतंय. मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलंय.  या सगळ्या प्रकरणात सर्वात धक्कादायक माहिती चाईल्ड लाइनने दिलीय.  हा मुलगा एग्रेसिव्ह झाला असून तो अंगावर धावून देखील जायचा. इतकंच नव्हे तर त्यामुलाच्या शेजाऱ्यांनी मुलाला कुत्र्यांप्रमाणे चार पायावर चालताना देखील पाहिलं आहे.