धक्कादायक! पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा; सभासदाऐवजी इतरांना फ्लॅट्सची विक्री
वारजे माळवाडी येथील `रामनगर गृहरचना सहकारी सोसायटी`मध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.
पुणे : वारजे माळवाडी येथील 'रामनगर गृहरचना सहकारी सोसायटी'मध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादास गाटे आणि सेक्रेटरी गणेश बजरंग माने (वय 42, रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी या ठिकाणी रामनगर सहकारी सोसायटी उभी केली जाणार होती. या सोसायटी करता 218 मूळ सभासदांनी नावे नोंदविली होती. या सभासदांना शासनाकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देतो असे आरोपींनी सांगितले होते.
दीपक वेताळ आणि अन्य सभासदांकडून 1990 पासून आज पर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे रोख रकमा स्वीकारल्या. एवढेच नव्हे तर शासनाकडून 1 हेक्टर 76 गुंठे जमीन देखील प्राप्त करून घेतली. या जागेवर 396 सदनिकांचा मोठा गृह प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाचे बांधकाम झाल्यानंतर यामधील सदनिका मूळ सभासदांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी इतर लोकांना विकल्या.
याबद्दल शासनाला आणि न्यायालयाला वेळोवेळी खोटी माहिती सादर करण्यात आली. त्यामुळे सोसायटीचे मूळ सभासद आणि शासनाची अंदाजे 200 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. त्यावरून चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल काळे करीत आहेत.