पुणे: भाजपच्या नेत्यांमध्ये धमक नसल्यामुळेच ते शरद पवारांनी घडवलेले नेते आयात करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केली आहे. भाजपकडे नेते नाहीत. त्यामुळे आमच्याकडून गेलेले नेते त्यांच्या डब्यात पाणी भरत आहेत. याचा अर्थ कार्यकर्ते आणि नेते घडविण्यात भाजप कमी पडत आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, बारामतीमध्ये महाजनादेश यात्रेच्यावेळी झालेली घोषणाबाजी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. महाजनादेश यात्रा बारामतीमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर 'एकच वादा, अजित दादा' अशी घोषणा दिल्या होत्या. 


काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. अमित शहा यांनी सोलापूरमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी आजपर्यंत काय केलं, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी म्हटले होते की, गरज पडली तर साहेबांचा सल्ला घ्यायचा, गरज पडली तर बारामतीत येऊन साहेबांचं कौतुक करायचं आणि आणि निवडणूक आली की त्यांनी विचारायचं साहेबांनी काय केलं? भाजपचा असा डबल ढोल असतो. तो दोन्ही बाजूने वाजतो, असे रोहित यांनी म्हटले होते. 


गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये उदयनराजे भोसले, राणा जगजितसिंह पाटील, सचिन अहिर, वैभव पिचड, मधुकर पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे. पक्षाला लागलेल्या या गळतीमुळे शरद पवार पेचात सापडले आहेत. अशा परिस्थितीत रोहित पवार आजोबांच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसत आहेत. रोहित पवार यंदाच्या निवडणुकीत राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.