सागर आव्हाड, पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राइव्हने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे भाजपनेत्यांना विविध केसेसमध्ये अडकवण्याचे कथित कारस्थान उघडकीस आणले होते. याप्रकरणी तेजस मोरे आणि तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.  माजी मंत्री आणि भाजपनेते गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्हा प्रसारक मंडळ प्रकरणातील तपास अधिकारी आणि मोरे यांच्यातील व्हाट्स ऍप चॅट 'झी 24 तास'च्या हाती लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळ प्रकरणात कोणावर कोठे छापे टाकायचे? पंच कोणाला घ्यायचं? याची माहिती मोरेंनी तपास पोलीस अधिकाऱ्यांना पुरवली असल्याचे दिसून येत आहे.


इतकचं नाही तर पोलिसांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था असलेली ठिकाणे मोरे यांनी पोलिसांना कळवली असल्याचेही  समोर आले आहे. 


पोलिसांना न्यायालयात या केस संदर्भात जे म्हणणं मांडायचं होत त्याचा ड्राफ्टही मोरे यानेच पोलिसांना दिला होता. अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. 


याचाच अर्थ तेजस मोरे हा तपास अधिकारी आणि प्रवीण चव्हाण यांच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका करत होता. परंतू तेजस मोरे विरोधात प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.


 या तक्रारीनंतर मोरेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्हा लवकर नोंद केला जाणार आहे. त्यामुळे नक्की हे प्रकरण यापुढे कोणत्या दिशेला जातं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये.