पुणे: देशातील १८ ते २१ या तरुण वयोगटातील मतदारांना नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची भुरळ पडली. त्यांच्यासमोर असे काही मुद्दे मांडण्यात आले की, हा वर्ग भाजपकडे स्विंग झाला. मात्र, काँग्रेसने या वर्गाकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवाचे सविस्तरपणे विवेचन करताना या परिस्थितीमधून पक्षाला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, यावरही सविस्तर भाष्य केले. हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, देशाच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कोणताही पक्ष पुन्हा सत्तेत आला तेव्हा त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या आहेत. ही गोष्ट खूपच धक्कादायक म्हणावी लागेल. त्यामुळे आता या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी राज्यातील विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे. तसेच आगामी निवडणुकीसाठी एकत्र येताना संख्याबळापेक्षा निवडून येण्याच्या क्षमतेला (इलेक्टिव्ह मेरिट) प्राधान्य द्यावे, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. 


ही पहिलीच अशी निवडणूक होती की, ज्यामध्ये विकासकामांवर चर्चा झाली नाही. जर या सरकारच्या काळात खरंच विकास झाला असता तर कोणीही नाखूश राहिले नसते. याउलट मोदी सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणावर सामाजिक तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांना वाईट दिवस आले, महागाईही वाढली. मात्र, निवडणुकीत याचे प्रतिबिंब पडलेच नाही. आम्ही ही सगळी नाराजी मतांमध्ये रुपांतरित करण्यात कमी पडलो, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.


त्यामुळे आता आगामी काळात विरोधकांमधील प्रमुख नेत्यांना एकत्र बसून चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पक्षातून बाहेर गेलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी सर्व लहानसहान पक्ष आणि संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यावेळी केवळ संख्येचा विचार न करता इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य द्यावे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.