हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे:- भिमाशंकर अभायारण्य परिसरातील घोटवडी गावाच्या बाजुने वाहणाऱ्या ओढ्यात पडुन ३५ वर्षीय आदिवासी शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक नागरिक व पोलीस पाटील यांच्या मदतीने वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. बाळु भिका बांगर असे ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भिमाशंकर परिसरात पाऊसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. बाळु बांगर हे बांगवाडीवरुन घोटवडीकडे जात होते. त्यावेळी घोटवडीजवळील ओढ्याचे पाणी पुलावरुन जात होते. हा पूल पार करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते ओढ्यात पडले. 


घोटवडी गावाजवळील ओढा हा पुढे जाऊन आरळा नदीला जाऊन मिळतो. सध्या मुसळधार पावसामुळे ओढा व नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे या परिसरात शोधकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. खेड तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बांगर यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नायब तहसिलदार राजेश कानसकर यांनी दिली.