पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. 


 उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रीमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. 


मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी सांप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, यांनीही वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.