अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यामध्ये हल्ली कोण, कुठे, कुणावर बंदूक़ रोखेल याचा नेम नाही. हॉटेलचा पत्ता सांगितला नाही म्हणून एकावर एअर गन मधून गोळ्या झाडण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत सनी चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अंबादास होंडे या आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी चौधरी ( वय १७ वर्षे, राहणार इंदिरा नगर, बिबवेवाडी) हा बग्गीच्या घोड्यांची निगराणी ठेवण्याच्या काम करतो. शुक्रवारी रात्री तो काम संपल्यानंतर गणेश पेठेत एका हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. त्यानंतर तो घरी चालत परत निघाला होता. लक्ष्मी रस्त्यावरील सीटी पोस्ट चौकात आला असताना एका स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या चार तरूणांनी त्याला प्यासा हॉटेल कुठे आहे ते विचारले. त्या तरुणांना दारु हवी होती. 
त्यावर त्याने माहित नाही असे  उत्तर दिले. गाडीतल्या तरुणांनी त्याला त्यांच्या गाडीतून पाहिजे त्या ठिकाणी सोडतो असे आश्वासन दिले. आपली सोय होतेय म्हटल्यावर तो त्यांना प्यासा हॉटेलपाशी घेऊन गेला. तिथे त्यांनी दारु खरेदी केली. त्यांनी गाडीत बसून दारु प्यायली. विशेष म्हणजे सनी देखील त्यांच्यासोबत दारु प्यायला.


त्यानंतर त्यांनी सनीला त्याच्या घराच्या रस्त्यावर सोडणे अपेक्षित होते. मात्र तसे घडले नाही. ते त्याला वाकडेवाडीच्या दिशेने घेऊन गेले. मरीआई चौकात आल्यानंतर त्यांनी सनीला त्रास द्यायला सुरवात केली. इतकेच नाही तर हॉटेलचा पत्ता आधीच का सांगितला नाही, याचा जाब विचारत त्यांनी त्याला मारहाण केली. त्याही पुढे जाऊन त्यांच्यातील एकाने सनीवर एअर गनमधून गोळीबार केला. त्यात त्याच्या मांडीला जबर दुखापत झाली. सनीने कसेबेसे त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. त्याने घडला प्रकार त्याच्या मालकाला सांगितला. दुसऱ्या दिवशी त्यांनी बिबवेवाडी चौकात तक्रार दिली. गुन्हा फरासखाना हद्दीत घडल्यामुळे तो फरासखाना पोलीसांकडे वर्ग करण्यात आला.  त्यानुसार पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. महत्वाचे म्हणजे फिर्यादी असलेल्या सनीने देखील काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत गुन्हा उघडकीस आणला. त्याविषयी सांगताना फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर नावंदे म्हणाले, याप्रकरणी अंबादास होंडे याला अटक करण्यात आलीय. अंबादास हा मुळचा नगर जिल्ह्यातील असून त्याच्यावर तिकडे आधीचे गुन्हे दाखल आहेत.


त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याचे आणखी तीन साथीदार आहेत. ते पुण्यतील दापोडी परिसरात राहणारे आहेत. एक वाढदिवस साजरा करून येत असताना त्यांनी हा गुन्हा केलाय. विशेष म्हणजे यातील फिर्यादी आणि आरोपी यांचा याआधी कधीच संबंध आलेला नाही. फिर्यादी कडून अर्धवट माहिती मिळाली असताना सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हे अन्वेषण पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे. 


पीएसआय सूर्यवंशी या गुन्ह्याचा तपास करत आहेत. सुमेध गायकवाड, सोम्या आणि बंड्या अशी यातील इतर आरोपींची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत जखमी असलेल्या सनी चौधरीवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचा तसेच त्यांच्याकडील एअरगनचा शोध घेण्यात येत आहे. किरकोळ कारणावरून पुण्यामध्ये गंभीर गुन्हे घडत आहेत. त्याविषयी नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.