पुणे: पुणे शहरात शुक्रवारी शतकातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. आज पुण्यात ४२.६ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. यापूर्वी १८९७ सालच्या एप्रिल महिन्यात ४३.३ इतक्या तापमानाची नोंद झाली होती. यानंतर आज पुण्यातील तापमानाच्या पाऱ्याने इतका उच्चांक गाठला आहे. यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असेल तर मे महिन्यात काय होईल, अशी चिंताही अनेकांना सतावू लागली आहे. तापमान असेच वाढत राहिल्यास यापूर्वीचे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे वेधशाळेने गुरुवारीच उष्णता लाटेमुळे राज्यातील तापमान वाढणार असल्याचा इशारा दिला होता. पुण्यातील तापमान फारतर ४२ अंशांपर्यंत जाईल, असा अंदाज होता. मात्र, शुक्रवारी त्यापेक्षाही जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. वेधशाळेच्या माहितीनुसार, कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात वाढ होत असल्यामुळे रात्रीही उकाडा वाढलेला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहील, असे वेधशाळेने सांगितले. 



चंद्रपूरात उष्णता लहरीमुळे पक्ष्यांचा मृत्यू


चंद्रपूरात उष्णतेची लाट आल्याने माणसांबरोबरच पक्ष्यांनाही मोठा फटका बसताना दिसत आहे. नागपूर मार्गावर असलेल्या ताडाळी गावजवळच्या गोरजा तलावावर डझनभर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तापमानात अचानक वाढ झाल्याने पक्ष्यांनी प्राण सोडल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आज चंद्रपूरमध्ये मोसमातील सर्वाधिक ४५.६ डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले. गेल्या दशकातील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक जास्त तापमान आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी चारा-पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी निरीक्षकांनी केले आहे.