पुणे: अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्यामुळे जोडप्याला जिवंतपणे जाळल्याची घटना ताजी असतानाच पुणे शहरही अशाच एका घटनेने हादरले आहे. येथील चांदणी चौकात एका तरुणावर बुधवारी संध्याकाळी चार व्यक्तींनी गोळीबार केला होता. मात्र, हा प्रकार आंतरजातीय विवाहाच्या रागातून घडल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुषार पिसाळ असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याने काही दिवसांपूर्वी एका तरुणीशी लग्न केले होते. याच रागातून तुषारचे चुलत सासरे आणि मेव्हण्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी तुषारचे चुलत सासरे राजू तावरे, सख्खे मेहुणे आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषारने काही दिवसांपूर्वी राजू तावरे यांची पुतणी विद्या हिच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहाला तावरे कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच विद्याचे काका आणि तिच्या भावांनी तुषारला ठार मारण्याचा कट रचला होता. यामध्ये सागर पालवे यानेही त्यांना मदत केली. 



तुषार पिसाळ भोरमधील राजेगाव येथील रहिवासी आहे. तो बुधवारी भुगाव येथे एका लग्नासाठी आला होता. यावेळी हे सर्वजण त्याच्या मागावरच होते. लग्नावरून परतताना तुषारची दुचाकी बंद पडली. ही दुचाकी घेऊन तो मित्रासोबत चांदणी चौकात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर आला. त्यावेळी राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे आणि सागर पालवे यांनी तुषारला घेरले. राजू तावरे याने तुषारवर पिस्तूल रोखून मागून आणि पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या. तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार पाहून तुषारच्या मित्रानेही तेथून पळ काढला. काहीवेळानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेतील तुषारला रुग्णालयात दाखल केले. यानंतर तुषारने दिलेल्या जबानीच्या आधारे पोलिसांनी राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे आणि सागर पालवे यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.